जिल्हाधिकारी कार्यालयावर ३०० शेतकरी धडकले

नाशिक: मौजे आडवण (ता. इगतपुरी) तसेच नाशिक शहरातील सातपूर, अंबडमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यास विरोध दर्शविला जात असून, शुक्रवारी (दि. २३) सकाळी घोटी येथून निघालेला पायी अर्धनग्न मोर्चा तब्बल २६ तासांनंतर शनिवारी (दि. २४) दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत भूसंपादनास तीव्र विरोध दर्शविला. जवळपास ३०० शेतकरी मोर्चात सहभागी झाले.

शुक्रवारी सकाळी १० वाजता आडवण येथून अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. अगोदर अंबड व सातपूर येथील औद्योगिक वसाहतीतील ११०० हेक्टर दिलेल्या शेतजमिनीचे जिल्हाधिकाऱ्यांनी ऑडिट तसेच तपासणी करावी व जागा घेऊ नये यासाठी मोर्चा काढण्यात आला. सकाळी निघालेला हा मोर्चा तब्बल १२ तासांनंतर म्हणजे रात्री १० वाजता विल्लोळी येथे पोहोचला. यानंतर शनिवारी पुन्हा सकाळी १० वाजता मोर्चा नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनकर्ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्याच्या डोक्यात असलेल्या टोपीवर प्रकल्पग्रस्त शेतकरी, गावकरी असे लिहिण्यात होते.
एमआयडीसीने इगतपुरी तालुक्यातील आडवण पारदेवी येथील शेतकऱ्यांची जमीन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात दोन्ही गावांतील ग्रामस्थ, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. अंबड-सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दतीर, ज्ञानेश्वर कोकणे, तुकाराम कोकणे, भास्कर गुंजाळ, नामदेव कोकणे, यामिनी कोकणे, रोहिदास शेलार, पांडुरंग कोकणे, नारायण शेलार, काळू रेरे, आदी सहभागी झाले होते.
![]()

