नाशिक। दि. १२ नोव्हेंबर २०२५: अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस विभागाने प्राधान्याने पूर्ण करुन चार्जशीट विहित कालावधीत दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, पोलीस उपअधिक्षक नितीन गोकावे, पोलीस निरिक्षक (नाहसं) संदीप बोराडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले की, या कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस विभागाने 60 दिवसांच्या आत पूर्ण करुन लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावे. ज्या पीडीतांचे जातीचे दाखले प्रलंबित आहेत. त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करुन दाखले प्राप्त होण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. ज्या पिडीतांचे अर्थसहाय्य देणे प्रलंबित असेल त्याची पूर्तता करण्याच्या सूचना यावेळी केल्यात.
या बैठकीत अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत विनयभंग, पोक्सो व इतर दाखल पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणे, न्यालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रस्तावित गुन्ह्यांचा तसेच सप्टेंबर 2025 मध्ये दाखल प्रकरणांचा, प्रकरणनिहाय आढावा घेण्यात आला.
![]()
