नाशिक, दि.12 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून हे अभियान जिल्ह्यात 15 ऑगस्ट 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकरी सीमा अहिरे यांनी केले आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ग्रामीण, शहरी भागातील प्रत्येक घरावर, शासकीय/ निमशासकीय, सहकारी, खासगी आस्थापना कार्यालयांच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा, असे शासनाचे निर्देश आहेत. यासाठी प्रत्येक गावात व शहरात स्वयंसहायता बचत गट व इतर व्यवसायिकांमार्फत राष्ट्रध्वजाचा पुरवठा होणार आहे. जिल्हास्तरीय / शहरातील महत्वाच्या शासकीय कार्यालये/ महत्वाची स्थळे/ पाणीसाठे आणि वारसा स्थळे या ठिकाणीही तिरंगा रोषणाई करणे अपेक्षित आहे.
या अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी अपलोड करण्यासाठी व स्वयंसेवक नोंदणीसाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळास भेट द्यावी. ‘हर घर तिरंगा’ अभियानात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे जसे रांगोळी स्पर्धा, राखी निर्माण स्पर्धा ज्यात तिरंगा विषयक बाबींचा समावेश असावा. यासह तिरंगा मेला, तिरंगासह सेल्फी, स्वयंसेवकांची नोंदणी, शाळा स्तरावर जनजागृती, लोकसहभाग व वातावरण तिरंगामय करणे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षी ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या घोषवाक्यांसह ‘हर घर तिरंगा’ उत्सव साजरा करण्यात यावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.