नाशिक: लोकसेवा हक्क अधिनियमानुसार वेळेत अधिसूचित सेवा द्याव्यात- आयुक्त चित्रा कुलकर्णी

नाशिक। दि. ११ एप्रिल २०२६: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार शासकीय विभागांनी अधिसूचित केलेल्या सेवा वेळेत द्याव्यात. आयोगाकडे अपील येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व कार्यालयांनी २८ एप्रिल रोजी सेवा हक्क दिवस साजरा करावा, असे निर्देश राज्य हक्क आयोग- नाशिकच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपसचिव सुनील जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे (प्रशासन) यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन विभाग थकबाकीदारांना ‘एआय’च्या माध्यमातून पाठविणार संदेश

आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले की, नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधिनस्थ सर्व सार्वजनिक प्राधिकरणांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा गतिमान, विहित कालमर्यादेत आणि गतिमान पद्धतीने देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम पारीत केला आहे. त्याची अंमलबजावणी २८ एप्रिल, २०१५ पासून करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध विभागांच्या सेवा वेळेत मिळण्यास मदत झाली आहे. आपले सेवा केंद्र, ई सेवा केंद्र, सेतू केंद्राच्या माध्यमातून या सेवा पुरविल्या जातात. नागरिकांना अधिसूचित केलेल्या सेवा वेळेत मिळतात किंवा नाही यासाठी जिल्हाधिकारी हे नियंत्रक अधिकारी आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात 9 मे रोजी होणार लोक अदालत

पात्र नागरिकांना विहित सेवा वेळेत न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना प्रथम, द्वितीय अपील करता येते. त्यानंतरही समाधान न झाल्यास आयुक्तांकडे तिसरे अपील करता येते, असेही त्यांनी सांगितले. महसूल व अन्य विभागांनीही गतिमान पद्धतीने सेवा देणे आवश्यक आहे. त्याचा नियमित आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. तसेच सेवा हक्क दिनानिमित्त २८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असेही आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात उष्णतेची तीव्रता वाढणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

आयोगाचे उपसचिव श्री. जोशी यांनी मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी श्री. हिरे यांनी सांगितले की, जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात एकूण १५ लाख ५२ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९७.६३ टक्के अर्ज निकाली निघाले आहेत. नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर आहे. जे विभाग वेळेत सेवा देणार नाहीत त्यांचा अहवाल राज्य सेवा हक्क आयोगाकडे सादर करण्यात येईल. सेवा हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. असेही त्यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी आभार मानले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790