news

नाशिक: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी (FLNAT) 15 मार्च रोजी

नाशिक। दि.१० मार्च २०२६: केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी (FLNAT) रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत राज्यभर आयोजित करण्यात येणार आहे. सन २०२५-२६ मध्ये ‘उल्लास’ अॅपवर नोंदणी केलेल्या असाक्षर व्यक्तींनी संबंधित परिक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहवे, असे आवाहन शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘उल्लास’ नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या चाचणीच्या माध्यमातून १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन व संख्याज्ञान कौशल्यांचा विकास घडवून आणण्याचा उद्देश आहेया कार्यक्रमाच्या माध्यमातून निरक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरतेबरोबरच आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आरोग्य व स्वच्छता जागरूकता, कुटुंब कल्याण, बालसंवर्धन आदी जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे.

महाराष्ट्र राज्यात १४ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार ही योजना स्वीकारण्यात आली असून २५ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्य, जिल्हा, तालुका व शाळास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे नियामक परिषदेचे अध्यक्ष असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग !

चाचणीमध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या तीन घटकांचा समावेश असून प्रत्येक घटकासाठी ५० गुण असे एकूण १५० गुणांचे मूल्यांकन होणार आहे. चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात किमान ३३ टक्के गुण आवश्यक आहेत. परीक्षा कालावधी तीन तासांचा राहील. दिव्यांग परीक्षार्थींना अतिरिक्त ६० मिनिटे वेळ देण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्याप्रकरणी पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यावर गुन्हा दाखल

चाचणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, तमिळ, बंगाली आदी भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. परीक्षेसाठी येताना परीक्षार्थींनी स्वतःचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो व ओळखपत्र (मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / पॅन कार्ड / बँक पासबुक इ.) सोबत आणणे आवश्यक आहे. ही चाचणी उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्यात येणार असून या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये साक्षरता वाढीस लागून जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790