नाशिक जिल्ह्यात ८ ते १४ एप्रिलदरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ चे आयोजन

नाशिक। दि. ९ एप्रिल २०२६: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात दि. ८ ते १४ एप्रिल, २०२६ या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण देविदास नांदगावकर यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ तयारीचा आढावा घेण्यासाठी घाटांची संयुक्त पाहणी

दि. ८ एप्रिल रोजी सप्ताहाचे उद्घाटन.

दि. ९ एप्रिल रोजी महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित व्याख्याने, वक्तृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त मानवाधिकार विषयक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.

दि. १० एप्रिल रोजी समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका सादर करून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली जाईल. तसेच लाभार्थ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन होईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्मयोगीनगर येथील जलकुंभावर अखेर ‘फायर हायड्रंट’ची सुविधा

दि. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येईल.

दि. १२ एप्रिल रोजी ‘संविधान जागर’ उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाची माहिती, मूलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. महिलांसाठी विशेष मेळावा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला जाईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: माडसांगवीत कोयता घेऊन दहशत माजवणारा जेरबंद

दि. १३ एप्रिल रोजी नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे, रक्तदान शिबिरे व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून विविध शासकीय कार्यालयांमध्ये ‘Online-Validity’ प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल.

दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शासकीय वसतिगृहे, शाळा व महाविद्यालयांमध्ये अभिवादन कार्यक्रम होणार असून सप्ताहाचा समारोप करण्यात येईल.

सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. नांदगावकर यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790