
नाशिक। दि. ८ डिसेंबर २०२५: संरक्षण दलातील सेवा ही गौरवशाली सेवा आहे. या सेवेत जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त किशोर काळे, पोलीस उप अधीक्षक हरीश खेडकर, शिक्षणाधिकारी सरोज जगताप (प्राथमिक), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलासराव सोनवणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी शहीद सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वीर पत्नी रेखा खैरनार, हर्षदा खैरनार, कमल लहाने, यशोदा गोसावी, भारती चौधरी, वीरमाता कृष्णा बोडके, मुन्निदेवी मिश्रा, विरपिता, वीर मुलगा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, ध्वजदिन निधीसाठी मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या निधीतून आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सार्वजनिक शासकीय कार्यक्रमातून ध्वज निधी संकलनाचे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच सामाजिक दायीत्व निधी (CSR) मिळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. निवृत्तीनंतर सैनिकांनी उद्योग, व्यवसाय सुरू केले पाहिजेत. त्यासाठी केंद्र सुरू करणे, शहरी- निमशहरी भागात सैनिक वसाहत स्थापन करण्याबरोबरच विविध पदक प्राप्त सैनिकांपासून तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून स्मारक उभे राहिले पाहिजे. त्यासाठी सैनिक कल्याण कार्यालयाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. आजी- माजी सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहांमध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.
पोलिस उपअधीक्षक श्री. खेडकर म्हणाले, की सैनिक अधिकाऱ्याचा पिता या नात्याने आपल्याविषयी आम्हाला संवेदना आहेत. आजी- माजी सैनिकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. सोनवणे यांनी सांगितले की, आजी- माजी सैनिकांच्या कल्याणार्थ केंद्र, राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांमध्ये देशभावना निर्माण करण्याचा हा दिवस आहे. राष्ट्रीय एकात्मता वाढीस मदत होते. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर ध्वज निधीचे संकलन केले जाते. अधिकारी, कर्मचारी ध्वज निधीसाठी मदत करतात. जिल्ह्यातून 1 कोटी 55 लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. यावर्षी 2 कोटी 94 लाख रुपयांचे संकलन करण्यात आले. या निधीतून सैनिकांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. वीर फाऊंडेशन यांच्यातर्फे मदत करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पोलिस उपायुक्त श्री. काळे, शिक्षणाधिकारी श्रीमती जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ लिपिक नारायण पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत पाल्याचा सत्कार:
यावेळी आजी- माजी सैनिकांचे गुणवंत पाल्य प्रीती देवधरे, अंकित आळेकर, मयुरी कोळी, शिवानी जोशी, हिमांशु पाटील, निकिता शिंदे, लक्ष्मी मवाळ, दिव्या पोर्चे, लिली महाजन, साक्षी बेलदार, अंकिता बच्छाव, गौरी साठे, संस्कृती गायकवाड, क्षितिज डोकळे, विवेक जगताप यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निधी संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार:
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सचिन शेळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप, पोलिस उपायुक्त श्री. काळे, पोलिस उपअधीक्षक श्री. खेडकर, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, सावरगाव, उपविभागीय अधिकारी, तहसील (चांदवड), विद्या ज्ञानेश्वर पन्हाळे, सीमा काळे (1 लाख रुपये मदत), अध्यक्ष, पांजरपोळ, नाशिक आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
![]()

