Breaking

दिंडोरी: नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजवली; मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रूपयांची मदत

नाशिक। दि. ५ एप्रिल २०२६: दिंडोरी येथे नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर बुजविण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

दिंडोरी येथे विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर मंत्री श्री. महाजन यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक !

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, नऊ जणांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या घटनेची सखोल चौकशीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार ते चौकशी करून अहवाल सादर करतील. या अपघातप्रकरणी संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला असून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790