
नाशिक। दि. ५ जानेवारी २०२६: ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकारांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राहक हक्क संरक्षण जागृतीमुळे फसवणूक, चुकीची सेवा व अन्यायकारक व्यवहारांपासून ग्राहकांचे संरक्षण होते. त्यामुळे ग्राहक हक्क संरक्षणाची व्याप्ती सर्व स्तरावरून वाढविणे गरजेचे असल्याचे मत अपर जिल्हाधिकारी (मालेगाव) देवदत्त केकाण यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त मनिष सानप, वैधमापन शास्त्र नाशिकचे उपनियंत्रक सुनिल सांगळे, धान्य वितरण अधिकारी शामली धपाटे, प्र.सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे संस्थापक दादाभाऊ केदारे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष हि.रा.जाधव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र (जिल्हा संघटक) दत्तात्रय शेळके यांच्यासह अधिकारी व ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री केकाण म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना सुरक्षिततेचा, माहितीचा, निवडीचा, तक्रार मांडण्याचा, तक्रार निवारणाचा व ग्राहक शिक्षणाचा हक्क दिला आहे. याद्वारे ग्राहकांना वस्तू/ सेवेची किंमत, दर्जा, वजन, अन्न पदार्थातील समाविष्ठ घटक व त्याबाबतची हमी यांची माहिती मिळते. विविध पर्यांयामधून योग्य वस्तू वा सेवा निवडणे, होणारी फसवणूक किंवा त्रुटीबाबत योग्य न्याय मिळविणे व ग्राहक म्हणून माहिती व प्रशिक्षण मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. ग्राहकांनी या हक्कांबाबत सजग राहून कोणतीही वस्तू खरेदीवेळी वजन-माप तपासणे, बिल घेणे व संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अन्नपदार्थ सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार असावेत यासाठी अन्न उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री व आयात यांचे नियमन करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 हा सन 2011 पासून अंमलात आला आहे. या कायद्यानुसार अन्न व्यवसायासाठी FSSAI परवाना / नोंदणी अनिवार्य केली आहे.अन्नात भेसळ, दूषित किंवा अपायकारक घटकांना मनाई, अन्नपदार्थांवरील लेबलवर उत्पादन तारीख, अंतिम मुदत, शाकाहारी/मांसाहारी चिन्ह असणे बंधनकारक आहे. अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता व स्वास्थ नियम पाळणे, दर्जेदार कच्चा माल वापरणे, परवाना क्रमांक स्पष्टपणे दर्शवणे या कायद्यान्वये अनिवार्य आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी अहवालात भेसळयुक्त अन्न आढळून आल्यास रूपये 10 लाखापर्यंतचा दंड व यामुळे मृत्यू झाल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. अन्न भेसळीबाबत ग्राहकांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या 1800-112-100 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन सह आयुक्त श्री सानप यांनी केले.
वैद्यमापन (वजन व माप) कायद्याअंतर्गत सर्व व्यापाऱ्यांना प्रमाणित व सत्यापित वजन-माप साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. संबंधित मोजमाप उपकरणांवर अधिकृत शिक्का व तपासणीची तारीख असणे आवश्यक आहे. या कायद्यामुळे कमी वजन देणे, चुकीचे मोजमाप करणे किंवा फसवणूक करणे यास आळा बसतो. ग्राहकांनी खरेदीवेळी वजन-माप तपासणे, बिल घेणे व संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवणे आवश्यक असल्याचे उपनियंत्रक श्री. सांगळे यांनी सांगितले.
राष्ट्रीय ग्राहक दिनासाठी यावर्षी ‘Efficient and speedy disposal through digital justice’ ही संकप्लना निश्चित करण्यात आली आहे. आजच्या डिजिटल व स्पर्धात्मक युगात वस्तूंची गुणवत्ता, योग्य किंमत, पारदर्शक व्यवहार, तक्रार निवारण आणि ग्राहक समाधान या बाबी महत्वाच्या आहेत.
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांना त्यांच्या हक्कांची, कर्तव्यांची तसेच संरक्षणासाठी उपलब्ध यंत्रणांची माहिती देणे व व्यापारी आणि सेवा पुरवठादारांमध्ये न्याय्य व जबाबदार व्यवहारांची जाणीव निर्माण करणे हा असल्याचे धान्य वितरण अधिकारी शामली धपाटे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
दादाभाऊ जाधव, हि.रा.जाधव, संजय पाटील, दत्ता शेळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच ‘संघटकांची अष्ठाध्यायी’ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. अन्न पदार्थातील भेसळ ओळखण्याबाबतची प्रात्यक्षिके अश्वमेध प्रयोगशाळेतर्फे सादर करण्यात आली.
![]()


