नाशिक। दि. ३ जानेवारी २०२६: विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अरीज सॉफ्टवेअर सोल्युशन्स यांनी ही यंत्रणा प्रायोजित केली आहे. अचानक हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांत तात्काळ एईडी उपलब्ध असावे, म्हणून मंदिर परिसराची निवड करण्यात आली आहे.
यावेळी विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनचे संचालक, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत विजन, डॉ. सृष्टी विजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एईडीची उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. “अचानक हृदयविकाराचा झटका कुठेही, अगदी पूजास्थळातही येऊ शकतो. पहिल्या काही मिनिटांत दिलेले डिफिब्रिलेशन जीव वाचवू शकते, म्हणूनच मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असलेल्या सार्वजनिक ठिकाणी एईडी बसविणे अत्यावश्यक आहे.” फाउंडेशनतर्फे नाशिक शहरात १०० एईडी बसविण्याचे उद्दिष्ट घेऊन कार्यरत आहे. फाउंडेशनतर्फे शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे, निवासी सोसायट्या आणि विविध सार्वजनिक संस्थांमध्ये आजवर हजारो नागरिकांना मोफत सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
डॉ. विनोद विजन यांनी कुंभमेळा प्राधिकरणांतर्गत कार्यरत ‘कुंभाथॉन इनोव्हेशन फाउंडेशन’सोबत मिळून एक अभिनव प्रकल्पही सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत कुंभमेळ्याच्या काळात आणीबाणीच्या प्रसंगी ड्रोनच्या माध्यमातून एईडी व आपत्कालीन वैद्यकीय मदत तातडीने पोहोचविण्याची योजना आखण्यात आली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
![]()


