नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ मार्च रोजी गोळाखाल शिवारात पुलाखालील नाल्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आलेल्या मृतदेहाची उकल करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

अज्ञात इसमांनी तरुणास जीवे ठार मारून ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी श्वानपथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करत तपासाला सुरुवात केली. मयताच्या अंगावर मिळून आलेल्या वस्तूवरून ओळख पटविण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कनाशी व अभोणा परिसरात त्यासाठी तळ ठोकला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंब्रा व भिवंडी येथून शहानवाज ऊर्फ बबलू शोएब शेख (४६, रा. खालीदशेठ चाळ), सादिक इब्राहिम खान (४८, रा. वारसी टॉवर ४०२ सावरकरनगर, मुंब्रा, जि. ठाणे) या संशयितांना ताब्यात घेतले.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार क्र. एमएच ०१ एइ०००८ या वाहनासह मोबाइल जप्त केले. शहानवाज ऊर्फ बबलू शोएब खान हे चारचाकी खरेदी- विक्रीचा व्यवसाय करीत असून मालेगाव शहरात ते चारचाकी बघण्यासाठी आले होते. त्यांनी अन्य साथीदारांसह संगनमत करून मयत शाहरुखखान महेबूब खान याच्या वर्तनाला कंटाळून त्याला मारहाण केली. तो बेशुद्ध झाल्यावर तो मयत झाला असे समजून निर्जनस्थळी टाकून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले.