नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. सटाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांनी संशयित पतीला नाट्यमयरित्या अटक केली. त्याला दोन मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सटाणा न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान सटाणा पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सर्व टिमचे अभिनंदन केले आहे.
केरसाणे (ता. बागलाण) येथील सरला आधार माळी (३५) ही काल (ता.२५) घरातून गायब झाल्याची तक्रार पतीने दिली होती. तिच्याबरोबर झटापट झाली असल्याचा बनाव करीत तशी तक्रार सूचना केरसाणे येथील आधार हरचंद माळी याने त्याच्या मित्रासह गुरुवारी (ता.२४) रात्री सटाणा पोलिसात येऊन तक्रार दाखल केली होती.
तक्रारीत तो सायंकाळी सहाच्या सुमारास कामावरून घरी आला असता घराचे दोन्ही दरवाजे उघडे होते व घरात पत्नी सरला ही कोठेही आढळून आली नाही. घरात पत्नीच्या हातातील बांगडया फुटून काचा पडलेल्या आणि डोक्याच्या पिना, स्कार्प घरात अस्ताव्यस्त स्थितीत पडलेल्या असून घरात काहीतरी झटापट झालेली दिसत आहे.
पत्नी घरातून बेपत्ता झालेली आहे. तिचा आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही असे फिर्यादीत म्हटल होते. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपासाची चक्रे फिरवत केरसाणे गाठले. एकंदरीत महिलेचे बेपत्ता होणे आणि तिच्या पतीने कथन केलेली हकिकत यावरून परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. पोवार, सहाय्यक निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व पोलिस कर्मचारी यांच्यासह मध्यरात्रीच केरसाणे येथील घटनास्थळी जाऊन पहाणी केली.
बेपत्ता महिलेचा पोलिस पाटील कांतीलाल सोनवणे व स्थानिकांच्या मदतीने शोध घेण्यास सुरवात केली असता बेपत्ता महिला तिच्या घराच्या बाजूस असलेल्या वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यामधील डाळींबाच्या शेतात मृतावस्थेत मिळून आली. मृतदेह विच्छेदनासाठी नाशिकला पाठवण्यात आला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
महिलेच्या शवविच्छेदनाअंती तिच्या मृत्यूचे कारण डोक्यामध्ये जड व बोथट वस्तूचा मार लागून जखमा झालेल्या असून तिचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. पती आधार हरचंद माळी (३५, रा. केरसाने शिवार) याच्याकडे तिच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी केली असता त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन झालेल्या वादात स्वतः लोखंडी मुसळी सरलाच्या डोक्यात मारली.
छातीच्या बरगड्यावर जोरदार प्रहार करून तिला जीवे ठार मारले. खुनानंतर घराशेजारील खड्ड्यांमधील शेतात तिचा मृतदेह नेऊन टाकल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांना व त्याच्या मित्रांना तसेच शेतवस्तीवरील लोकांना पत्नीसोबत काहीतरी बरेवाईट कृत्य घडले आहे असा बनाव करून तिचा शोध घेण्याचे नाटक केले.
मात्र पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच डॉगस्कॉड व फिंगर प्रिंन्ट तज्ञांची मदत घेऊन काही तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे. महिलेचा भाऊ आनंदा पंडित सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सटाणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.