नाशिक: राष्ट्रीय लोक अदालतीत 13 हजार 204 प्रकरणे निकाली; तब्बल 123 कोटींवर तडजोड शुल्क वसूल !

नाशिक, दि. 14 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 13 सप्टेंबर, 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 13 हजार 204 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 123 कोटी 88 लाख 86 हजार 965 रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले असून एक चाळीस वर्षांपूर्वीचा दावा निकाली निघाला आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड:

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

▪️ मोटार अपघात प्रकरणात एकूण 252 लाख रूपयांची तडजोड
मोटार अपघात प्रकरणात 2019 साली राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रक मध्ये झालेल्या अपघात बसमधील प्रवाशाचा मृत्यू झाला होता. सदर अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून मयताच्या वारसास रक्कम रूपये 92 लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली. 14 मार्च 2023 रोजी पक्षकार शरद कोठावदे यांची पत्नी शुभांगी कोठावदे या पार्कसाईड जवळ पायी चालत असतांना वेगाने येणाऱ्या कारने त्यांना बळीमंदिर चौकाजवळ धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रूपये 85 लाख रकमेची तडजोड करून वाद निकाली काढण्यात आला. सन 2023 मध्ये पाटबंधारे विभाग, संगमनेर येथील लिपिक राजकुमार जऱ्हाड हे मोटार सायकल व कार अपघातात मयत झाले होते. लोक अदालतीत उभय पक्षकारांनी परस्पर सहमतीने रूपये 75 लाख रकमेची तडजोड करून प्रकरण निकाली काढण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

▪️40 वर्षापूर्वीचा दावा निकाली
दिंडोरी न्यायालयातील सन 1985 चा दिवाणी दावा श्रीमती ए.ए. पंडीत व पॅनल सदस्य सीमा केदारे यांच्या समोर दोन्ही पक्षामध्ये झालेल्या समझोत्याने निकाली निघाला.

▪️ मोटार वाहन चालकांना दिलासा
नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण 1 हजार 715 मोटार वाहन प्रकरणामध्ये 222 प्रकरणे निकाली निघाली असून सदर वाहनचालकांना न्यायालीयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.

▪️ कौटुंबिक वादविवाद असलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड
लोकअदालतील एकूण 16 कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड झाली. यामुळे सर्व 87 प्रकरणांमधील 16 कुटुंबांना संबंध पूर्ववत झाल्याने समाधान मिळाले

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

▪️ निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात
▪️परक्राम्य संलेख अधिनियम,कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 1090 प्रकरणे
▪️मोटार अपघात प्रकरणे- 307 प्रकरणे
▪️कामगार विषयक- 8 प्रकरणे
▪️कौटुंबिक वादातील प्रकरणे- 87 प्रकरणे
▪️फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 258 प्रकरणे
▪️इतर – 2928 प्रकरणे

दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण एक लाख 99 हजार 443 इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 8 हजार 526 प्रकरणे निकाली निघाली असून रूपये 11 कोटी 29 लाख 15 हजार 671 रकमेची वसुली झाली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790