अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत: दादा भुसे

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे पालकमंत्री दादा भुसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमंगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहाय्यक योगेश निरभवणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करावी.

कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790