नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस कायम असून, दहा धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात तब्बल ९७ टक्के साठा झाला आहे. चालू महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः नांदगाव, येवला, सिन्नर, मालेगाव यासारख्या तहानलेल्या तालुक्यांवर वरुणराजाची कृपादृष्टी दिसून आली. धरणक्षेत्रात पावसाच्या समाधानकारक हजेरीने धरणसाठ्यात चांगली वाढ झाली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९५ टक्के साठा आहे. काश्यपी धरणात गेल्या वर्षापेक्षा यंदा ३१ टक्के साठा अधिक आहे. गौतमी गोदावरीत ९५ टक्के साठा असून, हा साठा गतवर्षीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी अधिक आहे. पालखेड धरणात ७१.९८ टक्के साठा आहे. करंजवन जवळपास भरले असून, गेल्यावेळी केवळ ६५.४४ टक्के साठा होता. दारणाने मात्र गेल्यावर्षी ९५.८६ टक्के साठा होता तितकाच यंदा कायम राखला आहे. मुकणे ८६ तर कडवा ८८ टक्के भरले आहे. चणकापूर धरणात मात्र तुलनेने तीन टक्के साठा कमी आहे.
माणिकपुंज, केळझर, हरणबारी, भोजापूर, वालदेवी, भावली, तिसगाव, ओझरखेड, वाघाड, आळंदी ही धरणे शंभर टक्के भरली असून, ओसंडून वाहत आहेत. साठा वाढल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जायकवाडीकडे आतापर्यंत ४२ दलघफू पाणी रवाना झाले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790