नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
महात्मा गांधी सप्ताह: एक्साइजची धडक मोहीम; नऊ मद्यपींसह व्यावसायिक गळाला
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गालगतच्या ढाब्यांवर बेकायदेशीररित्या मद्यप्राशन करणारे व मद्य उपलब्ध करून देणाऱ्यांची आता ‘खैर’ नाही. राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाने महात्मा गांधी सप्ताहच्या पार्श्वभूमीवर धडक मोहीम राबवून मुंबई महामार्गावर ९ मद्यपींसह त्यांना मद्य पुरविणाऱ्यांना दोन ढाबा व्यावसायिकांना ताब्यात घेतले.
राज्यभरात २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत महात्मा गांधी सप्ताह पाळला जातो. या सप्ताहाच्या पूर्वसंध्येला नाशिक एक्साईज विभागाच्या पथकाने (ब) मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी ते वाडीव-हे या दरम्यानचे ढाबे पिंजून काढले. दोन व्यावसायिकांसह ढाब्यांवर दारू प्राशन करणाऱ्यांवर दारू बंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
या कारवाईत सुमारे साडे तीन हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील आठवडाभर ही कारवाई सुरूच राहणार असून ती अधिकाधिक तीव्र केली जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिली.
बेकायदा मद्याची निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. या काळात मिशन गावठी दारू तसेच हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यावर झिंगणारे मद्यपीही उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर राहणार आहेत. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात भरारी पथके सक्रिय असून गावपातळीवरील व वाड्यापाड्यांवरील हातभट्या उद्ध्वस्त केल्या जात असल्याचे एक्साईज विभागाकडून सांगण्यात आले आहे.