नाशिक (प्रतिनिधी): निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सूचना आणि अलर्ट जारी केला आहे. IMD हवामान विभागाच्या अंदाजानुसार “निसर्ग” चक्रीवादळ मंगळवार आणि बुधवारी 2 ते 3 जून रात्री महाराष्ट्रावर धडकणार आहे. दिनांक 04 जुन 2020 च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील काही भागात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हंटले आहे.
त्यानुसार नागरिकांसाठी अतिशय महात्वाच्च्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये या काळात नागरिकांनी काय काय काळजी घ्यायची आहे हे सांगण्यात आलंय..
नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी:
दिनांक 03 व 4 जुन 2020 रोजी अतिवृष्टीमुळे घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी व सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे. घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशापासुन लांब रहावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे.
आपले जवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु आपल्या सोबत ठेवाव्यात.
सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे. बाल्कनी मधील हँगिंग किंवा लाइट मटेरियल उदा.फुलांची भांडी, कुंड्या व इतर जड साहित्य तात्काळ सुरक्षित कराव्यात. काचेच्या खिडक्या ढिल्या असतील तर तात्काळ दुरुस्त करा तसेच दाराच्या पॅनेलची तपासणी करुन ती दुरुस्त करा. वाहनावर झाडे व इतर साहित्य पडू नये यासाठी वाहने सुरक्षित करा. दुचाकी मुख्य स्टँडवर उभी करा.
प्रथमोपचार किट, बॅटरी, पॉवर बँक चार्जिंग करून ठेवा. जखमांसाठी आवश्यक औषधे व आजारी रुग्णाची औषधे सुरक्षित रुग्णाच्या बेड जवळ ठेवा. विद्युत वाहक तारा तुटल्याने व ट्रान्सफार्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी. जनरेटर साठी इंधनाचा पुरवठा असावा. वॉटर प्युरिफायरमध्ये विजेचे नुकसान झाल्यास पुरेसे पिण्याचे पाणी साठा करून ठेवा. शुजरॅक चांगल्या प्रकारे बोल्ट कराव्यात, सर्व शूज व इतर वस्तू चांगल्या प्रकारे एकत्र करून सुरक्षित केल्या पाहिजेत.
डिश टीव्ही व्यवस्थित घट्ट किंवा पक्के करा. एअर-कंडिशनर बाह्य युनिट्स पक्के करून घ्या. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. विनाकारण घराबाहेर पडू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका. झाडाखाली उभे राहू नका व झाडाखाली वाहने लावू नका. पत्र्याच्या शेड खाली उभे राहू नका.
सद्यस्थितीत जिल्ह्यात Home Quarantine असलेले नागरीक यांच्यासाठी आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळे निश्चित करावी व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर त्यांना सुरक्षीतस्थळी हलविण्याबाबत नियोजन करावे.