नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
निफाड (दीपक श्रीवास्तव): निफाड तालुक्यात वडिलोपार्जीत मालमत्तेत असलेल्या विहीरीच्या वादातून ८० वर्षीय वृध्दास पेटवून ठार मारल्याची घटना घडली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
निफाड पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार थडी सारोळे येथील 80 वर्षीय शेतकरी कचेश्वर नागरे आणि त्याच्या भावात वडीलोपार्जीत विहीरीवरून वाद निर्माण झालेला आहे. वयोवृध्द कचेश्वर नागरे हे मंगळवारी दि.९ रोजी आपल्या शेतातील घराजवळ साफसफाई करीत असताना त्यांच्या धाकटया भावासह दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले.
काही समजण्याच्या आत घडलेल्या या घटनेनंतर कचेश्वर यांनी सैरभैर पळत आग विझविण्याचा प्रयत्न केला. वडिलांचा ओरडण्याचा आवाज आल्याने कुटूंबियाने घराबाहेर धाव घेतली मात्र तत्पूर्वीच संशयित नागरे कुटूंबिय पसार झाले होते. अशा आशयाची तक्रार फिर्यादी पक्षाच्या वतीने निफाड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.
या घटनेत कचेश्वर नागरे गंभीर भाजल्याने मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल केले, मात्र या घटनेत कचेश्वर नागरे हे ९५ टक्के भाजल्याने त्यांचा जीव वाचू शकला नाही. बुधवार दि. 10 रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निफाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील आणि सहकारी कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.