नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावी शिवारात शिर्डीला जाणाऱ्या पुणे येथील साईभक्तांच्या कारसमोर दुसरी कार आडवी लावत चौघांनी शस्त्राचा धाक दाखवत ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ३० हजारांची रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. ४) सकाळी ६.३० च्या सुमारास घडली.
याबाबत वृत्त असे की अरविंद श्रीरामफल (३३, रा. तळवाडे) हे पुणे येथे अनिल थेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करतात. गुरुवारी (दि. २) ते कारने (एमएच १४ डीव्ही ५६०७) मनोजकुमार चंदेला, लक्ष्मीदा कांडपाल, शांती कांडपाल, मोनिका वर्मा व प्रियंका चंदेला (रा. सर्व दिवे) यांना देवदर्शनासाठी घेऊन निघाले होते. भीमाशंकर येथे दर्शन घेऊन रात्री नाशिकला ते मुक्कामी थांबले. शुक्रवारी त्र्यंबकेश्वर व पंचवटीत दर्शन घेऊन शनिवारी पहाटे शिर्डीकडे निघाले असता सकाळी ६.३० च्या सुमारास वावीच्या पुढे अचानक पाठीमागून आलेल्या कारने त्यांची कार अडवली. कारमधून चार जण खाली उतरले व भाविकांच्या कारकडे आले.
चौघांनी शस्त्राचा धाक दाखवत साईभक्तांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, हातातील अंगठी व रोख रक्कम व नऊ कपड्यांच्या बॅगा घेऊन पसार झाले. सकाळची वेळ असल्याने रहदारी नसल्याने साईभक्तांना मदत मागता आली नाही. यानंतर साईभक्तांनी वावी पोलिस ठाणे गाठत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
४ तोळे सोन्याचे दागिने, ३० हजार लांबवले:
चोरट्यांनी शांती कांडपाल यांच्या गळ्यातील सोन्याचे दिड तोळ्याचे मंगळसुत्र, मोनिका वर्मा यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन, प्रियंका चंदेला यांच्या हातातील ४ ग्रॅमची अंगठी, शांती यांच्या हातातील ७ ग्रॅमची अंगठी, लक्ष्मीदत्त कांडपाल यांच्या बॅगेतील २५ हजारांची रोकड, मनोज चंदेला यांचे पाकिटातील ५ हजारांची रोकड, मोनिका वर्मा यांच्या हातातील ६ ग्रॅमची अंगठी, मनोज चंदेला यांची ऑफिसी बॅग व त्यामध्ये त्यांचे चेकबुक व इतर महत्त्वाची कागदपत्रे हा ऐवज चोरून नेला.
![]()


