नाशिक | दि. १४ जानेवारी २०२६: जमिनीच्या वादातून महिलेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मूळ मध्य प्रदेश येथील जयकुमार बैगा (वय २६) याने अशोक्तीबाई शनिदयाल बैगा यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे सिद्ध झाले.
सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत आरोपी व मयत महिला सातपूर परिसरात भाडेकरू म्हणून समोरासमोर वास्तव्यास होते. गावाकडील जमिनीच्या वादातून २६ जून २०२३ रोजी आरोपीने घरात घुसून सुरीने महिलेचा गळा चिरल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेनंतर घरमालक आनंद नाठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा सखोल तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. आर. पठाण आणि सहायक पोलिस निरीक्षक धीरज गवारे यांनी केला. परिस्थितीजन्य पुरावे संकलित करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सुनावणीअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी आरोपीला दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा तसेच ७ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर व व्ही. आर. गायकवाड यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
![]()


