नाशिक। दि. ४ जानेवारी २०२६: पाच वर्षांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी रोशन सुभाष कोटकर (वय २०, रा. येवला) आणि चंद्रकांत ऊर्फ महेश भगवान लभडे (वय १९, रा. उत्तर प्रदेश) यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एम. दळव यांनी शनिवारी (दि. ३) ठोठावली.
सरकार पक्षाच्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास इंदिरानगर–वडाळा पाथर्डी रस्त्यावर रामचंद्र रामपराग निशाद (रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर अज्ञात कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपींनी धारदार हत्याराने डोक्यावर वार केल्याने निशाद यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर मुरुगल सिगमनी ऊर्फ तंबी (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी तपास करत परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या अंतिम सुनावणीत सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता रवींद्र निकम यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. साक्षी व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
![]()


