नाशिक। दि. १२ फेब्रुवारी २०२६: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला पळवून नेणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा जुलै २०२४ ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत नाशिक शहरातील इंदिरानगर परिसर तसेच पुणे येथे घडला होता.
या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण राधाकिसन कांबळे (वय ३६, रा. शिवकॉलनी, पांडवनगरी, नाशिक) हा फिर्यादीच्या अल्पवयीन बहिणीसोबत राहत असताना तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीने पीडितेला आई-वडिलांची शपथ घालून तसेच दमदाटी करून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. पीडिता अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचेही उघड झाले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६४(२), ६५(१), ३५१(२)(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा कलम ४, ६, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक सुहासनी सी. बारेला यांनी अत्यंत चिकाटीने करून आरोपीविरुद्ध सबळ व परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. त्यानंतर दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
कोर्ट क्रमांक ०६ येथे सुरू असलेल्या सुनावणीनंतर मा. न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले यांनी फिर्यादी, साक्षीदार व पंच यांच्या साक्षी तसेच तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीस सीआरपीसी कलम २३५(२) अन्वये दोषी ठरवले.
न्यायालयाने सुनावलेली शिक्षा:
बीएनएस कलम ६४(२) सह POCSO कायदा कलम ४ व ६ अंतर्गत जन्मठेप.
१ लाख रुपये दंड; दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास.
दंडाच्या रकमेतून ७५ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लिना चव्हाण यांनी कामकाज पाहिले. तसेच अभियोग कक्षातील अधिकाऱ्यांनी आणि न्यायालयीन पथकाने आरोपीस शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा केला. तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड (प्रभारी अधिकारी, अभियोग कक्ष, कोर्ट पैरवी पोलीस हवालदार सुधाकर गायकवाड, आणि महिला पोलीस हवालदार संगिता पाटील (नेमणुक: इंदिरानगर पोलीस स्टेशन), नाशिक शहर कोर्ट अंमलदार आर. व्ही. बोंबले (नेमणूक: अभियोग कक्ष, नाशिक शहर) यांनी सदर गुन्हयातील आरोपीतास शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.
![]()

