नाशिक (प्रतिनिधी): पर्यावरण (संरक्षण) कायद्यान्वये नायलॉन मांजा निमिर्ती, विक्री व वापरावर 1 जानेवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही नायलॉन मांजामुळे प्राणी, पक्षी व मानवी जीवितास इजा झाल्याच्या घटना निदर्शनास येत आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रशासकीय विभागांना पथके गठीत करून धाडसत्रे टाकून सखोल तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 च्या कलम 5 अन्वये नायलॉन मांजा विक्री, वाहतुक, साठवणूक व वापरावर जिल्हादंडाधिकारी नाशिक यांच्या 1 जानेवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये प्लॉस्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्यास मकरसंक्रात सणाच्या वेळी इतर वेळी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशान्वये संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यपारी तसेच साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती/ संस्था या पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 चे कलक 15 मध्ये नमूद शास्तीस पात्र होतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.