1 फेब्रुवारी रोजी मोहीमेचा होणार शुभारंभ
नाशिक (प्रतिनिधी): गतवर्षी राबविलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहीमेची यशस्वीता पाहता 1 फेब्रुवारी 2025 रोजी या मोहिमेचा शुभारंभ करून लोकसहभागातून ही मोहिम यशस्वी करावी, अश्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेच्या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट यांच्यासह सर्व तालुका जलसंधारण अधिकारी, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, नुकतीच जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीनुसार रबी हंगामासाठी शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देण्यात येणार आहे. यामुळे धरणांची पातळी आजच्या तुलनेत कमी होईल. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून हे अभियानाची सुरवात केल्यास पावसाळ्यापूर्वी निश्चितच धरणक्षेत्रातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होणार आहे. सद्यस्थितीत ज्या तालुक्यांमध्ये उपलब्ध पाणीसाठा कमी प्रमाणात आहे, तेथून या अभियानाची सुरवात करावी. या मोहिमेत यावर्षी नगरपालिका, नगर परिषद, सेवाभावी संस्था व नागरिक सहभागी करावे. धरणक्षेत्रातील काढलेला सुपिक गाळ शेतकरी, नागरिक, सह्याद्री समूह शेती करणारे शेतकरी, रोपवाटिका धारक , महानगरपालिका, नगरपरिषद यांची उद्याने यांना मोफत उपलब्ध करून द्यावा. या मोहिमेची नागरिकांना माहिती होण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिल्या.
तालुकास्तरावर किमान एक गावातील तलावामधील गाळ काढण्याचे नियोजन लोकसहभाग व संस्थांच्या मदतीने प्रत्येक विभागातील अधिकारी यांनी केल्यास यास गती मिळेल, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी सांगितले.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा ठराव घेवून जिल्हास्तरीय समितीस सविस्तर प्रस्ताव सादर केल्यास त्यास प्रशासकीय मान्यता घेता येईल. तसेच काढलेला गाळ स्वखर्चाने नेणाऱ्या शेतकऱ्यांची अवनी ॲपवर नोंदणी करावी, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत यांनी यावेळी सांगितले.