नाशिक: धावती कार पेटल्याने कारचालकाचा जळून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): धावत्या कारने महार्गावर अचानक पेट घेतला.
यात कार पूर्णपणे जळाली आहे.
तर वाहनचालकाचा या आगीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सिन्नर -घोटी महामार्गावर घोरवड घाटात वॅगनआर कार जळून खाक झाली.
यात चालकाचा जळून मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ४.२० वाजता ही घटना घडली. प्राथमिक तपासात सीएनजी लीक झाल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
विठ्ठल ऊर्फ किसन कृष्णा कोकाटे (२३, रा. अहमदनगर, सध्या पनवेल) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. त्यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. पनवेल येथून शिर्डीकरिता ते प्रवासी घेऊन आले होते. त्यानंतर ते नगर येथील त्यांच्या मूळ गावी गेले. तेथून पनवेलला परतत असताना घोरवड घाटात सुरुवातीलाच कारने (एमएच ४६ बीबी ६२६१) अचानक पेट घेतला.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10177,10166,10168″]
काही वेळातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी याबाबतची माहिती सिन्नर पोलिस ठाण्याला दिली. निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार नवनाथ शिरोळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तथापि कोकाटे यांचा मृत्यू झाला होता.
कारने पेट घेतल्यानंतर चालक कोकाटे यांना बंद असलेले चारही दरवाजे उघडता आले नाही. पहाटेची वेळ असल्याने मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांचा कारमध्येच मृत्यू झाला. ते १०० टक्के भाजले होते, अशी माहिती शवविच्छेदन करणारे डॉ. संजय वलवे यांनी दिली.
कारमधील सीएनजी गॅस लीक झाल्यामुळे पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. संपूर्ण कार जळून खाक झाली. कारचा केवळ सांगाडाच उरला हाेता. या हृदयद्रावक घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.