नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): निफाड तालुक्यातील दावचवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शाळा सुटल्यावरही वर्गातच राहून गेली. पालक व नागरिकांच्या मदतीने वर्गाच्या दाराचे कुलूप तोडून तिला सुखरूप बाहेर काढले. शाळा प्रशासन व शिक्षकांना घरी जाण्याच्या घाईत विद्यार्थ्यांवर किती लक्ष आहे, हे या घटनेवरून दिसून येते.
दावचवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीची जीविका अंबादास सुराडकर शाळा सुटल्यावर वर्गात होती. वर्गात कोणी राहिले तर नाही ना, याची खात्री न करता शिक्षकांनी तिला वर्गातच कोंडून वर्ग आणि शाळा बंद केली. शाळा सुटली मात्र जीविका घरी आली नाही. त्यामुळे पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली.
तिच्या मैत्रिणींना विचारले. मात्र, कुठेही जीविकाचा तपास लागला नाही. जीविका मिळत नसल्याने अखेर कासावीस होत पालकांनी हंबरडाच फोडला. जीविका मिळत नसल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. शाळेच्या आवारात वर्गाच्या खिडक्यांमधून आवाज दिल्यावर जीविका वर्गातच असल्याचे समजले.
तिला धीर देत तत्काळ वर्गाचे कुलूप तोडून तब्बल दीड तासाने जीविकाला बाहेर काढले अन् आईने पाणावलेल्या डोळ्यांनी तिला घट्ट मिठीत घेतले. जीविकाला बघताच आईवडिलांचा जीव भांड्यात पडला. सरपंच अशोक धुमाळ, डॉ. रामदास कुयटे, गोरख कुयटे, शांताराम शिंदे, बबन कुयटे यांनी वेळीच तत्परता दाखवून जीविकाला पालक अंबादास सुरडकर यांच्या स्वाधीन केले.
”शाळेत असे प्रकार घडणे, हे मुलांच्या दृष्टीने चुकीचे आहे. या घटनेत शिक्षकांची चूक असल्याने याबाबत कठोर कारवाई केली जाईल.”-डॉ. विजय बागूल, गटशिक्षणाधिकारी
”घडलेला प्रकार निंदनीय आहे. मात्र, आमची मुलगी सुखरूप बाहेर आल्याने आमची शाळा व शिक्षकांविषयी कोणत्याही तक्रार नाही.” -अंबादास सुराडकर
24 Total Views , 1 Views Today