नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई येथून नाशिककडे सोने, चांदीच्या दागिन्यांचे कुरिअर नेणाऱ्या इको कारला घोटीजवळील माणिकखांब शिवारात अडवत चार ते पाच दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात तब्बल ३ कोटी ६७ लाखांच्या ऐवजाची लूट करण्यात आली.
मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात गुरुवारी (दि. १८) पहाटे तीनच्या सुमारास घडलेल्या या थराराने जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहे.
मुंबई शहरातील काळबादेवी येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिस सेवा कंपनीतर्फे सोने-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल पोहोचविण्याचे काम केले जाते. बुधवारी (दि. १७) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास एमएच १२-यूजे-७९४८ क्रमांकाच्या इको कारमधून कंपनीचे मालक विष्णू सिंग यांनी कामगारांना दागिन्याचे पार्सल भरून दिले. त्यात नाशिक, धुळे, जळगाव येथील सराफा व्यावसायिकांची सोन्या- चांदीची बिस्किटे व अन्य दागिने होते.
गोपाल कुमार अशोक कुमार (२०) (मूळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश, ह. मु. मुंबई) तसेच चालक योगेंद्र शर्मा व आकाश तोमर हे नाशिकच्या दिशेने पार्सल घेऊन निघाले. गुरुवार (दि. १८) पहाटे तीनच्या सुमारास त्यांची कार घोटी टोलनाक्यालगत माणिकखांब शिवारात आल्यानंतर पाच ते सहा संशयितांनी अन्य ईर्टिका कार आडवी लावून पार्सल व्हॅन रोखली. संशयितांनी पार्सल व्हॅनजवळ जात चालकाला लोखंडी रॉडचा धाक दाखवत दरवाजा उघडण्यास धमकावले.
दरवाजा उघडताच संशयितांनी चालक बबलू ऊर्फ योगेश कुमार व आकाश तोमर यांना गाडीबाहेर ओढून त्याच्या डोळ्यांवर मिरचीची ची पूड फेकली. संशयितांनी गाडीचा ताबा घेऊन मुंढेगाव शिवारातील धाब्यावर कार थांबवत सोन्या-चांदीचे पार्सल काढून घेत पांढऱ्या रंगाच्या ईटिका कारने नाशिकच्या दिशेने धूम ठोकली. भेदरलेल्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथील अन्य कुरिअर कंपनीचे प्रेम सिंग यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. प्रेम सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घोटी पोलिसांना घटनेची माहिती दिली. महामार्गावर तत्काळ नाकाबंदी करण्यात आली आहे.
साडेचार किलो सोने, ४५ किलो चांदी:
- या धाडसी लुटीत कुरिअर पार्सलमधील ६६। लाख रुपये किमतीची १ किलो १०० ग्रॅम वजनाची सोन्याची ११ बिस्किटे (प्रत्येकी १०० ग्रॅम वजन), ३ किलो ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत २ कोटी ४ लाख रुपये), ९० किलो वजनाच्या तीन चांदीच्या विटा (प्रत्येकी ३० किलोग्रॅम वजन), ३२ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४५ किलो वजनाचे चांदीचे दागिने असा साडेचार किलो वजनाचे सोने, १३५ किलो चांदीचा ऐवज तसेच एक मोबाइल असा तीन कोटी ६७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटारूंनी लुटून नेला आहे.
- घटनेची माहिती मिळताच अप्पर अधीक्षक मिलखेलकर यांच्यासह उपअधीक्षक सुनील भामरे, पोलिस निरीक्षक विनोद पाटील, सहायक निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक अनिल ढोमसे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलिसांची तीन पथके लुटारूंच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. पार्सल व्हॅनमधील गोपाल कुमार अशोक कुमार याने घोटी पोलिसांत फिर्याद नोंदविली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनोद पाटील, निरीक्षक संदेश पवार, मारुती बोराडे, संदीप दुबळे, पंकज दराडे, कैलास नागरे तपास करत आहेत.
- फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दरोडा टाकणाऱ्या संशयितांपैकी एकाने काळे जॅकेट व काळी जीन्स, दुसऱ्याने खाकी रंगाचे जॅकेट घातले होते. हे सर्व संशयित ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असून, ते शरीराने धडधाकट व धिप्पाड होते. अशी माहिती पुढे आली आहे.