नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडजवळ राहुड घाटात एस. टी. महामंडळाच्या जळगाव-वसई बसचा मंगळवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू, तर ३१ जण जखमी झाले. यातील नऊ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील मृतांच्या वारसास दहा लाख रुपये, अत्यवस्थ जखमींना पाच लाख रुपये व किरकोळ जखमींना अडीच लाख रुपये मदत देखील जाहीर केली.
जळगावहून वसई येथे जाणाऱ्या वसई आगाराची बस (एमएच १४, केक्यू ३६३१) ही चांदवडजवळील देवी मंदिराजवळील हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळ आली असता, ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात बसचा वाहकाकडील अर्धा भाग अक्षरशः पूर्णपणे कापला गेला होता.
याच बाजूने पुढे बसलेल्या प्रवाशांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. घटनास्थळी जखमींचा आक्रोश, रक्ताचा सडा व रस्त्यावर पडलेले प्रवासी इतकं भयावह चित्र होते.
अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी शेवटच्या प्रवाशाला मदत होईपर्यंत उपस्थित होते. सोमा कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अत्यवस्थांना नाशिक, पिंपळगाव व मालेगाव येथील रुग्णालयांत पाठविण्यात आले. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३५ व्यक्तींना दुखापत झाली आहे. यापैकी आठ ते नऊ प्रवासी गंभीर असून, दोन पुरुष, एक अल्पवयीन मुलगा व एक महिला, अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
यामुळे या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातावेळी चांदवडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. मिळेल त्या वाहनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करीत होते. उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे नातेवाईक व जखमींच्या नातेवाइकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.