नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दिवाळी म्हणजे चैतन्याचा सण, सध्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील भालेकर आणि जाधव कुटुंबावर ऐन दिवाळीच्या तोंडावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन्ही कुटुंबातील अल्पवयीन युवतींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर गावातील के. टी. बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तरुणींवर काळाने घाला घातला. पूजा अशोक जाधव आणि खुशी भालेकर या 16 वर्षीय तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
कपडे धुताना दुर्घटना:
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा जाधव, खुशी भालेकर आणि कावेरी या तिन्ही मैत्रिणी नेहमी प्रमाणेच कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. चिंचविहीर गावाजवळ असलेल्या के. टी. बंधाऱ्यावर त्या कपडे धुवत होत्या. कपडे धुवत असताना अघटित घडले. पूजा आणि खुशी या दोघींचा अचानक पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडू लागल्या. त्या दोघी पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच कावेरीनेही तात्काळ पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिला त्या दोघींना वाचवण्यात अपयश आले.
गावकऱ्यांची घटनास्थळी धाव:
दरम्यान तिने आरडाआरोड करण्यास सुरूवात केली. ही सर्व बाब ग्रामस्थांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तिन्ही तरुणींना वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी या तिन्ही तरुणींना बाहेर काढले गेले त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पूजा आणि खुशी यांना मृत घोषित केलं. तर कावेरीवर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.