
नाशिक। दि. १७ जुलै २०२५: दुचाकी आणि अल्टोची समोरासमोर धडक होऊन अल्टो कार नाल्यात कोसळल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कळवण रस्त्यावर शिवनेरी हॉटेल व संस्कृती लोनसमोर हा अपघात झाला.
अल्टोमधील तीन महिला, तीन पुरुष व चिमुरड्या बालकाचा मृतांमध्ये समावेश आहे. मध्यरात्री हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या अपघातात स्पोर्ट्सबाईकवरील दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात एवढा जोरदार होता की अल्टो गाडी सरळ रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात उलटी झाली.
गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे. या भीषण अपघातानंतर गाडीतील प्रवाशांना बाहेर निघण्याची संधीही मिळाली नाही. त्यांच्या नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. अपघातामधील मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मृत हे कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील असल्याचे समजते दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातातील मृतांची नावे: 1) देविदास पंडित गांगुर्डे (वय -28 रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) 2) मनीषा देविदास गांगुर्डे, (वय -23 वर्षे, रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा. नाशिक) 3)उत्तम एकनाथ जाधव, (वय – 42 वर्षे रा- कोशिंबे, ता दिंडोरी, जिल्हा – नाशिक) 4) अल्का उत्तम जाधव, (वय – 38 वर्षे रा. कोशिंबे ता. दिंडोरी जिल्हा. नाशिक) 5)दत्तात्रेय नामदेव वाघमारे, (वय – 45 वर्षे रा. देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) 6)अनुसया दत्तात्रय वाघमारे, (वय – 40 वर्षे रा देवपूर, देवठाण ता – दिंडोरी, जिल्हा – नाशिक) 7) भावेश देविदास गांगुर्डे, (वय – 02 रा. सारसाळे, ता दिंडोरी, जिल्हा- नाशिक).