नाशिक। दि. १२ डिसेंबर २०२५: कर्ज देण्याच्या नावाखाली शिखरेवाडी येथे बनावट कॉल सेंटर उभारून १३ गरजू नागरिकांकडून सात लाख ७२ हजार ५०० रुपये उकळून कुठलेही कर्ज न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या ‘स्वास्तिक फिनसर्व्ह’ नावाच्या कॉल सेंटरवर सायबर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी संशयित आरोपी पवन महादू निकम (रा. जेलरोड) यास अटक केली आहे. त्याची महिला साथीदार फरार झाली आहे.
पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या नाशिक शहर पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ‘स्वास्तिक फिनसर्व्ह’कडून कर्ज देण्याच्या आमिषाखाली १८ हजारांना गंडा घातल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेत सायबर पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. शिखरेवाडी येथे संशयित पवन व त्याची साथीदार संशयित प्रीती उर्फ मयुरी चौरसिया (रा. काझीपुरा, जुने नाशिक) हे दोघे मिळून हे कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या छाप्यात काय सापडलं:
नागरिकांची नावे, मोबाईल क्रमांक व पत्ता इ. माहिती तसेच, नागरिकांना कॉल केल्यानंतर त्यांच्याशी काय व कसे बोलावे ही माहिती लिहिलेले सात रजिष्टर, अनेक नागरिकांची नावे, मोबाईल क्रमांक व पत्ता इ. माहिती लिहिलेले कागद ठेवलेल्या सहा फाईल्स, ३३ कस्टमर इंफॉर्मेशन शीट व डिक्लेरेशन फॉर्मस, ०२ रिसीप्ट बुक, RULOANS असे लिहिलेले व्हिजीटींग कार्डसचे पाच बॉक्स, वेगवेगळया कंपन्यांचे ९४ सिमकार्डस, वेगवेगळया कंपन्यांचे ५८ सिमकार्डस नसलेली पाकिटे, एक एचपी कंपनीचा लॅपटॉप, वेगवेगळे रबरी शिक्के, वेगवेगळया बँकांचे विविध नावांचे एकूण ३४ चेकस, तीन मोबाईल फोन असा एकुण रु. ८०,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत कार्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक पाटील, धिरज गवारे, हवालदार धनवटे, पाटील, गोसावी व महिला पोलीस शिपाई साबळे यांच्या पथकाने केली.
![]()
