नाशिक (प्रतिनिधी): अंधेरी सायबर सेलमधून बोलत असल्याचे दाखवून अज्ञात भामट्याने संभावित कारवाई टाळण्यासाठी रक्कम वर्ग करण्यास सांगून एका ४२ वर्षीय इसमाची सुमारे २३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे ४५ वर्षीय असून, ते दि. ३० ऑक्टोबर रोजी घरी होते. त्यावेळी एका मोबाईल क्रमांकावरून व स्काईप आयडी यावरून बोलणाऱ्या व चॅटिंग करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यादरम्यान, प्रदीप सावंत नावाच्या इसमाने अंधेरी सायबर सेलमधून बोलत असल्याचे भासवून तक्रारदार यांचे आधार कार्ड हे मनी लॉण्डरिंग व ड्रग तस्करीमध्ये संशयित म्हणून आढळले आहे.
“जर तुम्हाला तुमची यातून सुटका करून घ्यायची असेल, तर तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम ही फंड व्हेरिफिकेशनसाठी करावी,” असे सांगितले.
त्यानुसार तक्रारदार यांना संशयितांनी सांगितल्याप्रमाणे बँक खात्यांमध्ये एकूण २३ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.
![]()


