नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाईन पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून सातत्याने सायबर भामट्यांकडून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. यासंदर्भात सायबर पोलिसांकडून जनजागृती केली जात असतानाही तरुण वर्ग अशा ऑनलाईन जाहिरातींच्या आमिषाला बळी पडतात.
शहरातील नऊ तरुणांना सायबर भामट्याने अशारितीने ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून तब्बल ६८ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत अशोक आहिरे (रा. मेहरधाम, पेठरोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या ऑगस्ट २०२३ मध्ये अज्ञात संशयिताने व्हॉटसॲपवरून संपर्क साधला होता. त्यावेळी संशयिताने प्रशांत यांना ऑनलाईन पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून चांगली आर्थिक कमाई करण्याबाबतचे आमिष दाखविले. वारंवार संपर्क साधत संशयिताने प्रशांत यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना ऑनलाईन टास्क दिले.
ते टास्क करीत असताना प्रशांत यांना प्रत्यक्ष कामाचे पैसे मिळण्याऐवजी त्यांच्या पोर्टलवर ते दिसत होते. ते पैसे काढण्यासाठी त्याने संशयिताकडे तगादा लावला असता, संशयिता या ना त्या कारणाने त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेतले. त्यानुसार, प्रशांत यांनी विविध बॅक व युपीआयच्या माध्यमातून संशयिताने दिलेल्या खात्यावर पैसे वर्ग केले. परंतु त्यानंतरही संशयिताकडून सातत्याने पैशांची मागणी सुरूच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अशाच रितीने संशयिताने शहरातील आणखी ८ तरुणांची फसवणूक केली आहे. त्यानुसार संशयिताने तक्रारदार प्रशांत यांच्यासह ९ जणांची तब्बल ६४ लाख ६८ हजार ३६९ रुपयांची फसवणूक केली आहे. सदरचा प्रकार ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.