नाशिक | दि. २७ ऑगस्ट २०२५: सोशल मीडियावर वाढलेली ओळख एका महिलेस चांगलीच महागात पडली आहे. फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत सायबर भामट्याने तब्बल १६ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जेलरोड परिसरातील ३५ वर्षीय महिलेने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या मे महिन्यात फेसबुकवर तिला अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ऑनलाईन गप्पा सुरू झाल्या. काही दिवसांतच विश्वास संपादन करून ती मैत्री झाली.
यानंतर आरोपीने विविध बहाणे शोधून पैशांची मागणी सुरू केली. कधी स्वतःचा अपघात झाल्याचे सांगितले, तर कधी मुलीच्या प्रवेश व वसतिगृह फीच्या नावाखाली मदत मागितली. विश्वासात घेतलेल्या महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये व ऑनलाईन वॉलेटमधून पैसे पाठवले. काही महिन्यांतच तिच्याकडून तब्बल सव्वा सोळा लाख रुपये उकळण्यात आले.
शेवटी संशयिताचा संपर्क तुटल्याने महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तिने सायबर पोलिसांकडे धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलीस पुढील तपास करत आहेत.