नाशिक (प्रतिनिधी): पार्टटाइम जॉबच्या शोधात असलेल्या २ युवकांना ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या नादात सायबर भामट्यांनी १९ लाख रुपयांना गंडा घातला. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गेल्या सहा महिन्यांतील ही दहावी घटना घडली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर तक्रारदार यांना अज्ञात भामट्यांनी व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून जॉब संदर्भात सोशल मीडियाद्वारे मेसेज पाठवले. लिंकवर क्लिक करून क्रूड ग्रुप-१ आणि जसविंदर या नावाने असलेल्या टेलिग्राम प्रोफाइल व ग्रुप चॅटिंगद्वारे पार्टटाइम जॉब करून नफा मिळविण्याचे आमिष दिले. टास्कद्वारे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी फिर्यादी यांची ११ लाख ८६ हजार ६८८ रुपयांना, तर दुसऱ्या युवकाची ६ लाख ९७ हजार २२२ रुपयांची, अशी एकूण १८ लाख ८३ हजार ९१० रुपयांची फसवणूक केली. विविध बँकांच्या खात्यांवर व यूपीआय खात्यांवर रक्कम वर्ग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अशी झाली फसवणूक:
काही टास्कनंतर प्रत्येक टास्क पूर्ण करण्यासाठी अधिक पैशांची मागणी केली गेली. यात परतावा तिपटीने असल्याने दोघांनी वेळोवेळी १८ लाखांची रक्कम भरली. मात्र, ऑर्डर पूर्ण करूनही परतावा मिळाला नाही, तर ग्रुपमधून ब्लॉक करण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
![]()


