नाशिक: शेअर-फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक

नाशिक | दि. ५ सप्टेंबर २०२५ : ऑनलाइन गुंतवणुकीतून भरघोस नफ्याचे आमिष दाखवत एका महिलेसह तिच्या काकाने तब्बल २७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील करत आहेत.

सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एका व्यावसायिकास ‘सोनिया गुप्ता’ नावाच्या महिलेने सोशल मीडियावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. स्वतःला शेअर बाजारातील ब्रोकर असल्याचे सांगत तिने व्यावसायिकाशी संपर्क वाढवला. त्यानंतर तिच्या काका नितेश सिंह यांच्यामार्फत मोबाईल कॉल्स आणि चॅटिंगद्वारे शेअर मार्केट व फॉरेक्स ट्रेडिंगची माहिती देत गुंतवणुकीचे आमिष दाखवले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

संशयितांनी पीडिताला बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास सांगत विविध बँक खात्यांमध्ये आणि यूपीआय व्यवहारांतून तब्बल १२ लाख २३ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. नफा झालेली रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी आणखी पैसे भरण्याची मागणी केली.

याच पद्धतीने अन्य दोन गुंतवणूकदारांनाही सुमारे ६ लाख ८० हजार आणि ८ लाख ६६ हजार रुपये असा तोटा सहन करावा लागला. एकूण २७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790