नाशिक। दि. ०१ जुलै २०२५: सेवानिवृत्तीच्या जमा झालेल्या पीएफवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून एका वृद्ध कर्मचाऱ्यास १४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे ६२ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते द्वारका परिसरात राहतात. फिर्यादी हे घरी असताना त्यांना वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून बनावट नावे धारण करून पेन निअर या कंपनीतून बोलत असल्याचे आरोपींकडून भासविण्यात आले. दि. ११ नोव्हेंबर २०२१ ते १८ नोव्हेंबर २०२२ यादरम्यानच्या कालावधीत आरोपींनी फिर्यादींना सेवानिवृत्तीनंतरच्या जमा झालेल्या पीएफ रकमेवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखविले.
तसेच त्याबाबतची फी न भरल्यास ईडी, आयकर विभाग व सीबीआयला माहिती देऊन त्यांच्यामार्फत तुमच्यावर धाड टाकू, तसेच फिर्यादी यांना मिळालेल्या सर्व रकमा सील करण्याबाबतची भीती दाखवून एकूण १४ लाख ६० हजार ४२८ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत भरण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांकधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.