नाशिक। दि. १४ जानेवारी २०२६: सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखवून शहरातील चार उच्चशिक्षित नागरिकांची सुमारे ३६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपद्वारे अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीसह अन्य तिघांशी संपर्क साधला. घरबसल्या अधिक उत्पन्न मिळवून देण्याची ‘पार्टटाइम जॉब स्कीम’ असल्याचे भासवत सायबर गुन्हेगारांनी त्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला सतत संवाद साधून विश्वास निर्माण करत, नंतर विविध बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग करण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद आहे.
विशेष बाब म्हणजे फसवणुकीस बळी पडलेले चौघेही उच्चशिक्षित असून खासगी क्षेत्रात नोकरीस आहेत. सुशिक्षित व नोकरी करणारे असतानाही जादा पैसे कमावण्याच्या लालसेपोटी ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. या चौघांनी मिळून एकूण ३६ लाख रुपयांचा आर्थिक तोटा सहन केला आहे.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात व्हॉट्सअॅप क्रमांक व टेलिग्राम आयडीधारक अज्ञात व्यक्तींसह ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात आली त्या अज्ञात खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
![]()


