नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गुजरात एसटी महामंडळाच्या बसमधून मद्य तस्करी करणाऱ्या चालक-वाहकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक-सुरत महामार्गावर दिंडोरी शिवारात ही कारवाई केली.
बसमधून १ लाख १४ हजारांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. चालक विजय विनोद बलसार, वाहक अमृतभाई भुवनभाई पटेल (रा. सुरत) अशी या संशयितांची नावे आहेत. सुरत-नाशिक महामार्गावर बसमधून मद्य तस्करी वाहतूक होत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली. पथकाने सुरत महामार्गावर सापळा रचत संशयित (जीजे १८ झेड ८९७०) या क्रमांकाची बस थांबवली.
बसची तपासणी केली असता चालकाजवळील बॉक्समधून मद्यसाठा जप्त केला. मद्यसाठा पंचवटीतील एका शॉपमध्ये देणार असल्याची माहिती चालक व वाहकाने दिली. संशयितांचा शोध सुरू आहे. प्रवीण सानप, किशोर खराटे यांच्या पथकाने अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.