नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वडाळागावातील महेबूबनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला एमडी पावडर विक्रीचा अवैध अड्डा पोलिसांनी गुरुवारी उद्ध्वस्त केला.
याप्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. या धाडीत एमडी पावडर आणि गांजासारख्या अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नाशिक शहरात ‘मेफेड्रोन’ असे अधिकृत नाव असलेल्या एमडी या अमली पदार्थाचा विळखा घट्ट होत चालला आहे.
सांकेतिक भाषांद्वारे एमडीची विक्री सर्रासपणे नाशिक शहरात सुरु आहे. तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात अडकत चालली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे यांना याबाबत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वडाळा गावातील म्हाडा बिल्डिंगच्या मागे, मैदानाजवळ, सादिकनगर येथे या अमली पदार्थ विक्रीच्या अड्ड्यावर सापळा रचून छापा टाकला.
याप्रकरणी वसीम रफिक शेख (वय: ३६, राहणार: सादिकनगर, वडाळा, नाशिक) आणि नसरीन उर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (वय: ३२ वर्षे, रा. गल्ली नं. १, सादिकनगर, वडाळागाव, नाशिक) यांना अटक केली आहे.
या कारवाईत ५४. ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन आणि १. किलो ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण १,८९,२६० रुपये किमतीचा माल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी दुपारपासून सापळा रचत डमी ग्राहक पाठवून खात्री पाठविल्यानंतर संशयितांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक: २६८/२०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.
मुख्य पुरवठादार कोण ?;
वादळगावातील हा अड्डा जिल्हाभरात चर्चेत होता. महाविद्यालयीन तरुण या ठिकाणी घेऊन ‘माल’ घेऊन जात होते. या अड्ड्यावर ‘माल’ कोठून आणि कुणामार्फत पुरविला जात होता, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
कारवाईची नितांत गरज:
शाळकरी आणि कॉलेजच्या मुला-मुलींमध्ये ‘म्याव म्याव’ आणि ‘एम कॅट’ अशा सांकेतिक भाषेत ‘फेमस’ असलेल्या एमडी ड्रग या अमली पदार्थांचे अड्डे केवळ वडाळा गावातच नव्हे तर नाशिक शहरांच्या विविध भागातही सुरु असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.