नाशिक (प्रतिनिधी): गिरणारे येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर युवकाने पत्नी आणि सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी मृत युवकाच्या आईच्या फिर्यादीनुसार, नाशिक तालुका पोलिसांत संशयित पत्नीसह सासरच्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल गणपत थेटे (रा. गिरणारे) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या आई सरिता थेटे यांच्या फिर्यादीनुसार राहुलचा विवाह २०२१ मध्ये भगूर येथील पल्लवी हिच्याशी झाला होता.
मात्र, विवाहानंतर ती पती व सासूशी वाद घालत असे. तसेच, राहुल याच्यावर खोटे आरोप करीत स्वत:च्या जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकीही देत असे. त्याचप्रमाणे, तिच्या माहेरकडील मंडळीही राहुलला शिवीगाळ करीत धमकावत होते. गेल्या १५ तारखेला पुन्हा पती-पत्नीत वाद झाले होते. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर राहुल याने वरच्या खोलीत जाऊन स्वत:ला गळफास लावून घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात त्याने पत्नीसह सासरच्या मंडळींची नावे लिहिली आहेत.
तसेच, संशयित पत्नीकडून मारहाणीचेही व्हिडिओ आहेत. त्यानुसार, पत्नी पल्लवी, सासरा नंदू रामनाथ हारक, सासू अनिता, मेहुणा अंकेश, पल्लवीचा मावस मामा रामदास शिवदास धांडे, मावस मामी माधुरी रामदास धांडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.