रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ६२ जणांची ६ कोटी रुपयांची फसवणूक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेसह ६२ जणांची ६ कोटी २ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच परप्रांतीयांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वीरेश राजेश वाबळे (रा. नर्मदा हौसिंग सोसायटी, लोखंडे मळा, जेलरोड, नाशिकरोड) हे जिम ट्रेनर म्हणून काम पाहतात. दि. १५ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत वाबळे हे सायंकाळच्या वेळी घरी असताना त्यांचे परिचित शैलेंद्र महिरे यांचा फोन आला. त्यावेळी महिरे यांनी त्यांच्या फोनवरून आरोपी रमणसिंग ऊर्फ विशालसिंग (रा. कोलकाता) याच्याशी व्हॉट्सअॅप कॉलवरून बोलणे करून दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

रमणसिंग याने महिरे यांच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावून दिले होते. त्यामुळे वाबळे यांचा रमणसिंग याच्यावर विश्वास बसला. रमणसिंग याने वाबळे यांना त्यांच्या पत्नीस रेल्वेमध्ये नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखविले.

या कामासाठी रमणसिंग याने वाबळे यांच्याकडून प्रथम आठ लाख रुपये घेतले, तसेच या प्रक्रियेदरम्यान आरोपी रमणसिंग (रा. कोलकाता), निरज सिंग (रा. टाटानगर, झारखंड), ऋतूराज पाटील ऊर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली), राजेंद्र सिंग (रा. कोलकाता), अंशुमन प्रसाद (रा. रांची, झारखंड), संदीप सिंग (रा. रांची, झारखंड) व जैद अली (रा. वाशी, नवी मुंबई) यांनीही वाबळे यांच्या पत्नीस भारतीय रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. या सर्व आरोपींनी भारतीय रेल्वेचे बनावट व खोटे लेटरहेड, कागदपत्रे, शिक्के बनवून वाबळे यांच्याकडून वेळोवेळी रेल्वेतील नोकरी कायम करण्याकरिता एकूण ११ लाख रुपये घेतले, तसेच इतर ६२ जणांकडून नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एकूण ६ कोटी २ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

हा प्रकार दि. १५ डिसेंबर २०२१ ते १३ जून २०२४ यादरम्यान जेलरोड येथे फिर्यादी वाबळे यांच्या घरी घडला. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790