नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गोवंशीय जनावरांची हत्त्या करण्यास बंदी असताना, या आदेशाचे उल्लंघन करून गोवंशीय जनावरांची हत्त्या करून गोमांसाची अवैधरित्या तस्करी व विक्री करणाऱ्या १० संशयितांना शहर – जिल्ह्यातून दीड महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. शहर परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सदरचे आदेश बजाविले असून, यामुळे शहरात गोमांसाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गोमांस तस्कारांविरोधात धडक कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. असे असले तरीही गोमांस तस्करांकडून चोरीछुप्यारितीने गोमांस आणून त्याची विक्री करण्याचे प्रकार सुरू होते.
त्याविरोधात शहर गुन्हेशाखांच्या पथकांनी कारवाई केली आहे. गेल्या दोन महिन्यात गोहत्त्या व गोमांस विक्रीचे १६ गुन्हे आयुक्तालय हद्दीमध्ये दाखल आहेत. यात सर्वाधिक कारवाई ही भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. त्यानुसार, गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेल्या गोमांस तस्करांविरोधात हद्दपारीच्या कारवाईचे आदेश आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते.
त्यानुसार, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी हद्दपारीचे प्रस्ताव केले. त्या प्रस्तावांची अंमलबजावणीचे आदेश उपायुक्त चव्हाण यांनी जारी केले आहेत. त्यानुसार १० गोमांस तस्करांना शहर-जिल्ह्यातून दीड वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार गोमांस तस्कर:
सदाम कय्युम उर्फ बबलू कुरेशी, शोएब समद कुरेशी, इम्रान रमजान खान, इरफान नूर कुरेशी, सादीक मुश्ताक कुरेशी, मोहम्मद जोहेब अस्लम कुरेशी, जावेद रहीम कुरेशी, दानिश रहीम कुरेशी, जोहेब उर्फ सोनू समद कुरेशी, अंजूम बिस्मील्ला कुरेशी.