नाशिक | दि. ११ सप्टेंबर २०२५: शहरातील चांडक सर्कल परिसरात एका विवाहितेने सतत सुरू असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीनुसार, संशयित उमेश भवर हा मागील तीन महिन्यांपासून पीडित महिलेला सतत फोन व मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. मध्यरात्र, पहाटे यांसारख्या अयोग्य वेळेस केलेले फोन, सातत्याने मेसेज आणि थेट तिच्या राहत्या इमारतीत जाऊन धमक्या देणे, अशा प्रकारे त्याने मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
महिलेने त्याच्या आग्रहास नकार दिल्यानंतर आरोपीने इमारतीच्या परिसरात येऊन तिला धमकावले. सततच्या या छळामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली आली आणि अखेर २५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. या घटनेनंतर पीडितेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, मुंबई नाका पोलिस ठाण्याने पुढील तपास सुरू केला आहे. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २९७/२०२५)
![]()

