नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सहा वर्षे वयाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता. ५) शिक्षा ठोठावली. प्रकाश आबासाहेब ठोंबरे (वय ४३, रा. पाथरवट लेन, पंचवटी) असे आरोपीचे नाव असून, त्यास २० वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
वर्ष २०२३ मध्ये १० ते १४ जुलै या कालावधीत आरोपी प्रकाश ठोंबरे याने सहा वर्षीय मुलीला राहत्या घरी बोलावून धमकावत लैंगिक अत्याचार केले होते. चिमुरडीच्या पालकांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी यांनी तपास केला; तर पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत कर्पे यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले.
त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा सिद्ध होण्याच्या दृष्टीने मेहनत घेतली. यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक पाचमध्ये सुरू होती. शुक्रवारी न्यायाधीश पी. व्ही. घुले यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.
फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपास, अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी प्रकाश ठोंबरे यास बालकांचे लैगिंक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम सहामध्ये दोषी धरून २० वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून लीना चव्हाण यांनी कामकाज पाहिले. तसेच, पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार एम. एम. पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक एस. आर. शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.