नाशिक: विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी दोघांना गुजरातमधून अटक

नाशिक, दि. २५ मे २०२५: विवाहित महिलेस मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नोंद झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात दोन संशयित आरोपी तब्बल आठ दिवसांपासून फरार होते. मात्र, गुंडा विरोधी पथकाच्या कार्यतत्परतेने दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी दिलीप माडीवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीला – भक्ती अथर्व गुजराथी (वय ३३) हिला पती संशयित अथर्व गुजराथी, सासरे योगेश गुजराथी आणि सासू मधुरा गुजराथी यांनी माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या त्रासामुळे भक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला असून, गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२, ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक १२३/२०२५ नोंदविण्यात आला होता.

👉 हे ही वाचा:  जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू - कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाला आरोपींचा शोध घेऊन तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.

गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीद्वारे आरोपी गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील वांसदा परिसरात लपल्याची माहिती मिळवली. सदर माहिती पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. प्रशांत बच्छाव व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आली आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन कारवाईसाठी पथक गुजरातमध्ये रवाना करण्यात आले.

👉 हे ही वाचा:  मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

दि. २४ मे २०२५ रोजी पथकाने वांसदा पोलीस ठाणे हद्दीतील गुजरात राज्य वनविकास मंडळाच्या परिसरातून संशयित आरोपी अथर्व योगेश गुजराथी (वय ३५, रा. आनंदवली, नाशिक) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून टोयोटा चारचाकी (MH 15 JM 7421) व सॅमसंग मोबाईलसह एकूण ₹२१,००,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर संशयित आरोपी योगेश मनीलाल गुजराथी (वय ६५, रा. नवीन पंडीत कॉलनी, नाशिक) यास वांसदा येथील हॉटेल महाराजा अँड गेस्ट हाऊस येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: चहा विक्रेत्याला लुटणाऱ्या दोघांना अटक !

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, भुषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, कल्पेश जाधव, अशोक आघाव, सुनिता कवडे यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790