
नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर पोलिसांतील गुन्हेशोध पथकाचे अमलदार सागर परदेशी यांना मिळालेल्या माहितीवरून रचण्यात आलेल्या सापळ्यात राजीवनगर, चढ्ढा पार्क परिसरात दोघा दुचाकी चोरट्यांना बेड्या घालण्यात आल्या. त्यांच्याकडून १० लाख २० हजार रुपयांच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, इंदिरानगर, नाशिकसह इगतपुरी पोलिसांत दाखल गुन्ह्यांतील मुद्देमाल मिळवण्यात यश आले आहे.
गुन्हे शोधपथकाचे अधिकारी उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलिस नाईक सागर परदेशी यांसह पथकाने ही कारवाई केली. यात करण रमेश शिंदे (२६, रा. एमआयडीसीरोड, परभणी), श्यामसुंदर मनोज गेडाम (२६, गांधीनगर, अदिलाबाद, तेलंगणा) अशी दोघांची नावे असून त्यांच्या चौकशीत इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतील व शहरातील अन्य पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांतील दुचाकीदेखील मिळून आल्या आहेत.
यात आठ लाख रुपये किमतीच्या सात दुचाकींचा समावेश आहे. तर याच चोरट्यांकडून इगतपुरी पोलिस ठाण्यात दाखल चोरीस गेलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत दोन लाख २० हजार असल्याचे इंदिरानगर पोलिसांकडून सांगण्यात आले. या चोरट्यांच्या चौकशीत अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.