नाशिक (प्रतिनिधी): तालुका पोलिस ठाणे हद्दीतील गिरणारे गावाजवळच्या साडगावमध्ये राहणाऱ्या वृद्ध पती- पत्नीचा धारदार हत्याराने डोक्यात व छातीवर प्रहार करून खून झाला होता. घटना भाऊबीजेच्या दिवशी घडली होती. गुन्ह्याची उकल करण्यास नाशिक तालुका पोलिसांना यश आले. भाऊबीजेनिमित्त (दि. ३) ओवाळायला आलेल्या नराधम भावानेच जमिनीच्या वादातून सख्या बहिणीसह मेहुण्याचा डोक्यात धारधार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
रामू राघो पारधी (७०), चंद्रभागा रामू पारधी (६५) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मागील अनेक वर्षांपासून पारधी दाम्पत्य साडगावातील मारुती मंदिराजवळच्या त्यांच्या लहानशा घरात राहत होते. याप्रकरणी मृत चंद्रभागा पारधी हिचा सख्खा भाऊ सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (५०), रा. लाडची शिवार, ता.जि. नाशिक यास अटक करण्यात आली आहे. मृत दाम्पत्याची साडगावातील कोरडवाहू शेतजमीन असून केवळ पावसाळ्यात ते हंगामी पीक घेत होते. एरवी मजुरी करून उदरनिर्वाह करत होते.
जमिनीच्या वादातून आपण संतापाच्या भरात बहीण व मेहुण्याला ठार मारल्याची कबुली सोमनाथने दिली आहे. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजीत आमले यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहा. पोलिस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, सचिन देसले, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, रवींद्र गवळी यांच्या पथकाने ४८ तासांच्या आत दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा उघडकीस आणला.
मृतदेह ३ दिवस घरातच:
रामू पारधी व चंद्रभागा पारधी यांचे मृतदेह तीन दिवस घरातच पडून होते. त्यांचा खून भाऊबीजेच्या दिवशी ३ ऑक्टोबरलाच करण्यात आला होता. खून करून संशयित आरोपी सोमनाथ बेंडकोळी बाहेरून दरवाजा लावून फरार झाला होता. दाम्पत्य घरी दिसत नाही म्हणून घरापासून काही अंतरावर असलेल्या लोकांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता घरातून दुर्गंधी येत होती, तसेच दरवाजा बंद असल्याने संशय बळावला. आत जाऊन पाहिले असता पारधी दाम्पत्य मृतावस्थेत पडून होते. रक्ताचे खूप कमी डाग तेथे दिसून आले.
एकटेच राहत असल्याचा घेतला फायदा:
पारधी दाम्पत्य या ठिकाणी एकटेच राहत होते. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे माहेरून मिळत असलेली जमीन माझ्या नावावर कर, असा तगादा चंद्रभागा पारधीचा भाऊ सोमनाथ लावत होता. याच कारणाने दोघा भाऊ-बहिणीत यापूर्वीही वादावादी झाली होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. भाऊबीज असल्याने ओवाळायचे असल्याच्या कारणाने सोमनाथ बहिणीकडे आला होता. त्यावेळी दोघांत पुन्हा वाद झाला. यातून त्याने बहिणीच्या डोक्यात घाव घातले. भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुण्यालाही त्याने संपविले.
![]()


