नाशिक। दि. २७ ऑगस्ट २०२५: वाडीव-हे पोलिस ठाणे हद्दीत आहुर्लीरोडवर मुरंबी शिवारात पेट्रोलपंपावर कामगाराला कोयत्याने मारहाण करत पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी झाली. या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेल्या दोघांकडून जबरी चोरीचे आणखी तीन गुन्हे उघडकीस आले असून हे सराईत त्र्यंबक तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, २१ ऑगस्ट रोजी वाडीव-हे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलपंपावर दरोडा पडला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी यांना विचारपूस करून संशयितांचे कपडे, देहबोली व बोलीभाषा, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी यावरून माहिती काढली.
त्यानुसार संशयित हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याचे समजले. त्यावरून पथकाने संशयित दत्तू प्रकाश महाले (१९, रा. गणेशगाव) याच्यासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी केली असता त्यांनी आहुर्लीरोडवरील शेल पंपावरील कामगाराला कोयता हल्ला करून गंभीर जखमी करत जबरी चोरी केल्याची कबुली दिली.