नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमडी (मॅफेड्रॉन) हा अमलीपदार्थ निर्मिती करणारे दोन कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले होते. याबाबत नाशिकरोड पोलीसांना सुगावा देखील नव्हता, या प्रकरणाची चर्चा अजूनही सुरू असतानाच सोमवारी (दि. १८) पुन्हा नाशिकरोड भागातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला लागूनच एमडी विक्री सुरू होती.
याची माहिती क्राईम ब्रांच युनिट दोनला मिळताच त्यांनी ४८००० रुपये किमतीच्या १९ ग्रॅम एमडीसह संशयित विक्रेत्याला अटक केली. नाशिकरोड येथील सिन्नरफाटा भागातील या महाविद्यालयात नाशिक शहरातीलच नव्हे परजिल्ह्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात.
येथे विद्यार्थ्यांना हेरुन त्यांना एमडी विक्री होत आहे. सोमवारी युनिट दोनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार, सचिन जाधव, मनोहर शिंदे यांच्यासह पथकाने सापळा रचून विक्रेता संशयित किरण चव्हाण (रा. अश्विनीकॉलनी) याला १९ ग्रॅम एमडीसह ताब्यात घेतले.